Tuesday, 13 December 2011

स्मिता...


 
 स्मिता पाटीलचा आज २५ वा स्मृतीदिन

मुंबई : भूमिकामधली उषा, अर्थमधली पूजा, जैत रे जैतमधली चिंधी किंवा उंबरठामधली सुलभा...या सर्व व्यक्तिरेखांना मूर्त रुप देणारी समर्थ अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. अवघ्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत स्वतःच्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या स्मिता पाटीलचा आज २५ वा स्मृतीदिन. वयाच्या ३६ व्या वर्षीच स्मिताने जगाचा निरोप घेतला...मात्र मागे ठेवून गेली अनेक भूमिका आणि अभिनयाचा मापदंड. म्हणून आजही अनेक नवोदित अभिनेत्रींसाठी स्मिता पाटील हा आदर्श आहे. अनेक अभिनेत्रींमध्ये स्मिता पाटीलची छबी शोधणण्याचा प्रयत्न रसिक करतात, पण तरीही स्मिताची जागा २५ वर्षे रिकामीच आहे.

खरं तर रुढार्थाने नटीकडे असावं असं रुप तिच्याकडे नव्हतं. तरीही ती विलक्षण देखणी होती. खूप काही व्यक्त करणारे डोळे आणि बोलका चेहरा ही तिची बलस्थानं होती. त्याच्याच जोरावर अनेक व्यक्तिरेखा तिने जिवंत केल्या.

स्मिता पाटीलने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेतल्यानंतर श्याम बेनेगलांच्या चरणदास चोर मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्या काळात चित्रपटसृष्टीत मनोरंजनाच्या पलिकडे जाणाऱ्या वास्तववादी चित्रपटांचा एक प्रवाह निर्माण होत होता. याच समांतर, कलात्मक चित्रपटांच्या प्रवाहात गोविंद निहलानी, श्याम बेनेगेल, जब्बार पटेल अशा दिग्गजांसोबत स्मिताचा प्रवास सुरु झाला. जाणीवपूर्वक चोखालळलेल्या या वाटेवर स्मिताच्या वाट्याला  दर्जेदार भूमिका, रसिकांची पावती आणि समीक्षकांचं कौतुक येत गेलं.

मात्र आर्ट फिल्मची नायिका असाच शिक्का स्मितावर बसला होता. तत्कालिन काही अभिनेत्रींनी तर स्मिता जे करते ते आम्ही करत नाही हे मान्य, पण  आम्ही जे करतो ते स्मितानं करावं, अशीही विधानं केली होती. त्यामुळे मग स्मिताने नमकहलाल, शक्तिसारखे व्यावसायिक चित्रपटही केले. पण पावसात भिजत नाचण्याचा, झाडांमागे पळण्याचा तिचा पिंड नव्हता हेही खरंच...

स्मिताला भूमिका आणि चक्रसाठी स्मिताला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जैत रे जैत आणि उंबरठा या चित्रपटांसाठीही तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. भारत सरकारनेही पद्मश्री देऊन स्मिताच्या चित्रपटातील योगदानाचा गौरव केला.

कदाचित पुरस्कारांची, सन्मानाची यादी आणखीही वाढली असती...पण स्मिताने त्याआधीच एक्झिट घेतली होती...कोणाच्याही ध्यानीमनी नसताना...