Saturday, 26 November 2011

दोन जिवलग कलासक्त हातांची हृद्य भेट...

दोन जिवलग कलासक्त हातांची हृद्य भेट...

- कसं बोललात!..अगदी मार्मिक! मित्राच्या भेटीने कॉमनमॅन आर. के. लक्ष्मण भावनाविवश
पुणे । दि. २४ (प्रतिनिधी)
एक काळ होता, जेव्हा आम्हा दोन व्यंगचित्रकारांच्या हातांनी राजकारण्यांना थरथर कापायला लावले पण आज आमचेच हात थरथरताहेत.. अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. निमित्त ठरले ते दोन जुन्या मित्रांच्या-दिग्गज व्यंगचित्रकारांच्या हृद्य भेटीचे!
कॉमनमॅनमधून सामान्यांच्या वेदना नेमकेपणाने मांडणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण सध्या आजारी असून त्यांना खास भेटण्यासाठी ठाकरे यांनी तब्बल ४ वर्षांनी पुण्यात पाऊल ठेवले. अलिशान रोल्स रॉईस गाडीतून औंधमधील हरिष पार्क येथील लक्ष्मण यांच्या निवासस्थानी ते आले. या वेळी त्यांच्यासमवेत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, आमदार नीलम गोर्‍हे, चंद्रकांत मोकाटे आदी होते. पांढर्‍या रंगाचा झब्बा आणि भगवी शाल पांघरून त्यांनी लक्ष्मण यांच्या घरात पाऊल ठेवले तेव्हा मराठमोळय़ा पद्धतीने त्यांचे औक्षण करुन लक्ष्मण परिवाराने त्यांचे स्वागत केले.
लक्ष्मण यांच्या भेटीविषयी सांगताना ठाकरे म्हणाले, की फ्री प्रेसमध्ये जेव्हा मी स्टाफवर गेलो तेव्हाच लक्ष्मणही तिथे नोकरीला लागला तेव्हापासूनची आमची मैत्री. अधूनमधून तो मला भेटायलाही यायचा. इतक्या वर्षांनी आम्ही भेटलो. मला पाहून तो रडायलाच लागला. आता तो बोलू शकत नाही. बोलणं हा माझा पेशा आहे.
आजकालची व्यंगचित्रे राजकारण्यांवर प्रहार करत नाहीत याचेच दु:ख आहे, असे सांगून ते म्हणाले, रेषा आणि कल्पना यांचा सुरेख मेळ घालताना उत्तम राजकीय ज्ञान व खोली असावी लागते. लक्ष्मण आणि मी आम्ही रेषाही सांभाळल्या आणि कल्पनाही. प्रसारमाध्यमांवर ठाकरे यांनी परखड टीका केली. ते म्हणाले, आजही मी दररोज १६-१७ वर्तमानपत्रे वाचतो. डोळ्य़ांनी आता त्रास होतो इतरांकडून वाचून घेतो. पण, एक मात्र खरं की प्रसारमाध्यमांचे जे काही चालले आहे ते बरोबर नाही. मुंबई-ठाणे महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीची युती झाली तरीही सारे शेवटी लोकांवर आणि प्रसारमाध्यमे काय दाखवतात यावर अवलंबून आहे. जर एकतर्फीच बाजू दाखवलीत तर मला या रणधुमाळीत उतरावे लागेल.
कॉमनमॅन गहिवरला..!
अंथरुणावरून उठूही न शकणार्‍या लक्ष्मण यांनी ठाकरे यांना पाहिले आणि त्यांच्या भावना अनावर झाल्या. त्यांच्या डोळ्य़ांतून वाहणार्‍या आसवांनीच भेटीचा आनंद व्यक्त केला. एकमेकांचा हातात हात घेऊन ठाकरे यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. बोलता येत नसले तरीही लक्ष्मण यांनी त्याहीअवस्थेत पडल्यापडल्या एक कॉमनमॅन रेखाटला आणि ठाकरे यांना भेट दिला. ठाकरे यांनीही त्यांना एक पुस्तक भेट दिले.
मी पुणेकरच..!
उपस्थित पत्रकारांकडे पाहत, तुम्ही सगळे पुणेकर का? असा प्रश्न ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, मी सुद्धा पुणेकरच. कारण माझा जन्म पुण्यातील आहे. पण मी इथे बिघडेन म्हणून वडिलांनी मला मुंबईला नेऊन ठेवले.

No comments: